मॅसॅच्युसेट्स च्या उत्तर पुर्वेला अटलांटिक महासागराच्या निळाईनं वेढलेल्या अनेक छोट्या छोट्या गावांपैकी "रॉकपोर्ट" हे चिमुकलं गाव! नावाप्रमाणेच किनारा कुठे लहान दगड गोट्यांनी तर कुठे मोठ्या खडकांनी सजलेला. प्रथमच कार घेउन जाताना जाणवतो तो किना-याशी सलगी करत जाणारा वळणा वळणांचा सुरेख डामरी रस्ता आणि दोन्ही बाजुला अनेक रंगांनी फुललेला मुलामाणसांचा व्यापार. सुखदश्या थंडगार वसंतातून नुकताच ग्रीष्मात शिरलेला! जिकडे तिकडे लहान लहान रेस्टॉरंट्स, कॉफ़ी, पेस्ट्रीची आणि ग्रोसरीची दुकानं, खुर्च्या टेबलं बाहेर मांडून मस्तं समुद्री हवा आणि विविध थंड गरम खाद्यपेयं एन्जॉय करत बसलेली टुरिस्ट मंडळी. प्रत्येकजण कुणाची तरी साथ घेउन आलेला. माझ्यासारखा मी एकटाच! :(. असो, माझ्याबरोबर माझा कॅमेरा होता हे ही नसे थोडके! हा एकच सीझन इथे असा की प्रत्येकजण जमेल तेव्ह्ढे उन्हाळी कपड्यांचे शौक करत आपापली "शौकीनता" पुरेपूर दाखवत फिरणार. मग ती तनु"लता" असो की तनु"लोटा"!
दोन अडीच मैल काठाकाठानी असंच पुढे गेलं की एक सुंदर स्टेट पार्क लागतं. दीडशे वर्षांपुर्वी इथे ग्रॅनाईट्ची मोठी क्वारी किंवा खाण होती. आता तिथे भरपूर पाणी साठून एक छोटेखानी तलावच झाला आहे. चारी बाजूंनी ग्रॅनाईट च्या सपाट दगडांनी वेढलेला.
अतिशय संथ, शांत आणि गहिरं निळंशार पाणी बघून एक अनामिक अशी जाणीव मनात दाटून येते.
गंमत अशी की या तलावाच्या पलिकडे नजर गेली की बॅकग्राऊंड ला पसरलेला विस्तीर्ण असा अटलांटिक महासागर, तो ही तेव्ह्ढाच निळा! जणू काही हा तलाव त्या समुद्राचाच भाग आहे त्या मधल्या जमिनीच्या पट्ट्यानी विभागलेला. पण प्रत्यक्षात तलाव १०० एक फ़ूट उंचीवर आहे. तलावाच्या उजव्या अंगानी पुढे गेल्यावर या उंचीची चांगलीच कल्पना येते.
माणसांना पोहायला मनाई आहे ...
पण सी-गल्स आणि बदकं मजेत विहरत असतात.
त्यादिवशी तिथे एका स्थानिक रॉक बँड चा सुंदर कार्यक्रम होता. विनाशुल्कं असलेल्या या कार्यक्रमाची तयारी मात्र जोरदार होती. या लोकांचं मला यासाठी नेहमीच खुप कौतुक वाटतं की यांची तयारी अव्वल दर्जाची असते. गाणारे, वाजवणारे, त्यांची वाद्यं, स्पीकर्स, मायक्रोफोन्स सगळं कसं व्यवस्थित. कुठे माइक/स्पीकरचा आवाज फाटत नाही की अवाजवी कर्कश होत नाही. गाणारे सुद्धा तयारीचे!
| या फोटोवर क्लिक करा..मग समुद्र सपाटीपासूनच्या उंचीची कल्पना येईल. |
| एकूण काय तर "Rockport Rocks!" |